पनवेल कल्चरल सेंटर मथ्ये कालिदास दिन साजरा
'आषाढस्य प्रथम दिवसे'च्या निमित्ताने आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात दि.15 जुलै रोजी पनवेलमधील संस्कृत शिक्षिका अनया करंदीकर यांचे महाकवी कालिदास व त्याचे जगप्रसिद्ध काव्य मेघदूत या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. जवळपास दीड तासाच्या आपल्या व्याख्यानात त्यांनी कालिदासाची चरित्र कथा तर सांगितलीच पण त्यांच्या तीन नाटके व दोन खंडकाव्याचा परामर्ष घेत मेघदूताचा काव्याचा रसास्वादही रसिक श्रोत्यांना दिला. आपला स्वामी कुबेर याला शिवार्चने करता ताजी कमळपुष्पे त्याचा सेवक यक्ष याने आणून न दिल्याबद्दल कुबेराच्या शापामुळे एक वर्षभर यक्षाला त्याच्या प्रेयसीचा विरह सहन कराव लागतो व त्या विरह कालात तो आकाशातील मेघालाच दूत बनवतो व आपला प्रीती संदेश स्वर्गातल्या प्रेयसीला पाठवतो व त्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन म्हणजेच मेघदूत हे अजरामर काव्य. या काव्याचा आनंद अनया करंदीकर यांनी आपल्या सुमधूर वाणीने रसिकांना पुरेपूर दिला. या व्याख्यानामुळे रसिक श्रोते पुन्हा एकदा मेघदूत काव्यानंद घेण्यात प्रेरित होतील एवढे निश्चित म्हणता येईल.
वर्षाकालीन मैफल
संस्थेच्या प्रथेप्रमाणे मैफलीचे मुख्य कलाकार पं. संजीव चिम्मलगी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्ज्वलन झाल्यानंतर संगीत विभाग प्रमुख संध्या घाडगे यांनी कलाकार व साथीदारांचं स्वागत, प्रास्तविक व परिचय करुन दिला.
पंडितजींनी मैफलीची सुरूवात गौडमल्हार रागाने केली. त्यात विलंबित तिलवाडात एक व दृत त्रितालात दोन बंदिशी गायल्या. मध्यंतरानंतर पंडितजींनी राग मेघ,
रामदासी मल्हार, सूर मल्हार अशा वर्षाकालीन रागांत झपताल, त्रिताल, दृत एकताल अशा विविध तालांमध्ये काही अप्रतिम रचना सादर केल्या.
या मैफलीत हार्मोनियम साथ अभिषेक काठे यांनी तर तबला साथ राज भद्रा यांनी उत्तमरीत्या केली.
तानपुरा व स्वरसाथीस बसलेले पंडितजींचे दोन्ही शिष्यही चांगल्या तयारीचे होते. एकूण सध्या जरी पावसाने दडी मारलेली असली तरी पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात जमलेले श्रोते मल्हारच्या सुरांच्या वर्षावात चिंब भिजून गेले.
संस्थेतर्फे वर्षभरात वर्षाकालीन मैफल, गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दीपोत्सवी मैफल, राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धा आणि एप्रिलच्या शेवटच्या रविवारी संस्थेचा वर्धापनदिन असे कार्यक्रम होतात.
संस्थेने गेल्या तीन दशकांच्या वाटचालीत दीडशे मैफलींचा टप्पा पूर्ण केला असून या मैफलीमध्ये पं. सी. आर. व्यास, विद्याधर व्यास, पं. सतीश व्यास, पं. अजय पोहनकर, विदुषी डॉ. वीणा सहस्रबुद्धे, माणिकबुवा ठाकूरदास, उस्ताद झिया फरिदुद्दिन डागर, उस्ताद मोईनुद्दिन डागर, अस्लम खान, पं. राजन आणि साजन मिश्रा, डॉ. प्रभा अत्रे, पं. प्रभाकर कारेकर, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर, पं. संजीव अभ्यंकर, शरद जांभेकर, पं. कैवल्यकुमार गुरव, डॉ. राम देशपांडे, विदुषी कलापिनी कोमकली, पं. जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे, रघुनंदन भट, प्रकाश घांग्रेकर, शिवानंद पाटील, डॉ. प्रकाश संगीत, पं. उल्हास बापट, पं. शैलेश भागवत, शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी आशा खाडिलकर, पं. उपेंद्र भट, पं. चंद्रशेखर वझे, पं. आनंद भाटे, विदुषी अर्चना कान्हेरे, विदुषी फैय्याझ, पं. विभव नागेशकर, रुपक कुलकर्णी, रतन शर्मा अशा अनेक नामवंत गायक वादकांनी रंग भरले आहेत.
या सर्व गुणी, लोकप्रिय गायक वादकांना साथसंगत करणार्या तेवढ्याच तोलामोलाच्या गोविंदराव पटवर्धन, सुलतान खॉं, अरविंद पारिख, साई बँकर, नाना मुळे, सीमा शिरोडकर, विश्वनाथ शिरोडकर, विश्वनाथ कान्हेरे, अजय जोगळेकर, केदार पंडित, रामदास पळसुले, योगेश समसी, सुधीर नायक, तन्मय देवचके, डॉ. अनीश प्रधान, ओजस अढिया, मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, माधव मोडक अशा प्रतिभावान संगतकारांनी या मैफलींना चार चॉंद लावले आहेत.