राज्यस्तरीय कथक नृत्य स्पर्धेत मिहीका भिडे, अभिज्ञा जोशी आणि सुहानी भट ठरल्या प्रथम क्रमांक विजेत्या पनवेल कल्चरल सेंटर आणि कर्नाटक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकल कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये नुकतेच करण्यात आले होते. बालनृत्यांगनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कथक या नृत्यप्रकाराविषयी जनजागृती निर्माण करणे व कथकचा प्रसार करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 51 स्पर्धकांनी भाग घेतला होता. मानसी देशपांडे आणि चेतन सरय्या या कथक क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्तींनी स्पर्धेचे परीक्षण आणि सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेच्या गट 1 (अ) मध्ये मिहीका भिडे हिला प्रथम, अनाहिता बहुगुणा हिला द्वितीय आणि स्वरा इशवाद व रचना बेंबळीकर या दोघींना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. गट 1 (ब) मध्ये अभिज्ञा जोशी हिला प्रथम तर अनन्या माकोडे हिला द्वितीय पारितोषिक देण्यात आले. गट 2 मध्ये सुहानी भट हिला प्रथम, सहिष्णुता राजाध्यक्ष हिला द्वितीय तर पराग कुंभार याला तृतीय पारितोषिक देण्यात आले. पनवेल कल्चरल सेंटरच्या नृत्यविभाग प्रमुख श्रीकला जोशी यांनी या स्पर्धेचे अतिशय नेटके आणि काटेकोर नियोजन केले होते. याप्रसंगी पनवेल कल्चरल सेंटरचे अध्यक्ष मिलिंद गोखले तसेच कर्नाटक संघाचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद शेट्टी उपस्थित होते.